गर्भधारणेपूर्वी बी.एम.आय.नॉर्मल ठेवून सर्वसाधारण पोषणस्थितीत येणे

 

बॉडी मास इन्डेक्स (बी.एम.आय.)

स्त्रियांनी आपली उंची मोजावी, वजन घ्यावे, आणि तुम्हाला दिलेल्या तक्त्यानुसार तुमचा बॉडी मास इंडेक्स (बी. एम. आय) म्हणजे शारीरिक वस्तुमान निर्देशांक काढावा. तुमची उंची (मीटर मध्ये) आणि वजन (किलोग्रॅम मध्ये) मोजून पुढील गणित करून बी. एम. आय. काढता येतो.

बी.एम.आय = वजन (कि.ग्रॅ) / उंची (मीटर)२

हा तुमच्या पोषणाची स्थिती दाखवणारा निर्देशांक आहे. यानुसार तुमची गणना पुढीलपैकी एका गटात होत असते.

• कुपोषित व्यक्ती : बी.एम.आय १८.५ कि/मी²पेक्षा कमी

• सर्वसाधारण पोषण : बी.एम.आय १८.५ ते २२.९ कि/मी²

• वजन जास्त : बी.एम.आय २३.० ते २४.९ कि/मी²

• लठ्ठपणा : बी.एम.आय २५ कि/मी²

तुमचा बी. एम. आय. १८.५ पेक्षा कमी किंवा २५ इतका किंवा त्या पेक्षा जास्त आहे का, हे पहा. बी. एम. आय. कमी असणे हे कुपोषित असल्याचे लक्षण आहे.

गर्भ रहाण्यापूर्वी बी.एम.आय १८.५ पेक्षा कमी असल्यास दिवस राहिल्यानंतर होणारे बाळ अपुऱ्या दिवसांचे, कमी वजनाचे, आणि अशक्त असण्याची शक्यता अधिक असते. यासाठी आहाराचे प्रमाण वाढवून दर महिन्याला वजन करुन बी.एम.आय वाढवणे हिताचे असते.

लठ्ठपणाचे परिणाम :

• लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणी रक्तदाब वाढण्याची आणि मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते.

• प्रसूती अवघड होण्याची शक्यता असते.

• गर्भामध्ये विकृती निर्माण होऊ शकते आणि व्यंग असलेल्या बाळाचा जन्म होऊ शकतो.

• मुदतपूर्व प्रसुती, प्रसूतीमधील गुंतागुंती यामुळे नवजात अर्भकाच्या जीवाला धोका असतो.

यासाठी जास्त बी.एम.आय. असणाऱ्या स्त्रियांनी दर महिन्याला वजन करुन बी.एम.आय. सर्वसाधारण पातळीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसच एकदा वैद्यकीय तपासणी करुन मधुमेह, हायपोथायराँयडिझम किंवा इतर आजार नाहीत ना हे तपासून घ्यावे.

पोषण स्थितीनुसार करावयाची कार्यवाही :

बी.एम.आय. : १८.५ कि/मी²पेक्षा कमी असल्यास काय करावे –

• आहाराचे प्रमाण वाढवा

• दर महिन्यास वजन करुन ते वाढत असल्याची खातरजमा करा.

• बी. एम. आय. योग्य पातळीत येईपर्यंत गर्भधारणा पुढे ढकला

बी.एम.आय. : ≥ २३ कि/मी² असल्यास काय करावे –

• योग्य आहार घ्या.

• वरचेवर खाणे टाळा.

• तळलेले, तेलकट पदार्थ टाळा.

• रोज नियमित चाला.

• व्यायाम करा.

• दर महिन्यास वजन करुन ते कमी होत असल्याची खात्री करा.

बी.एम.आय. : ≥ २५ कि/मी² (लठ्ठपणा) असल्यास काय करावे –

• आरोग्यदायी आहार

• आहारावर नियंत्रण

• नियमित चालणे व इतर व्यायाम

• दर महिन्यास वजन करुन ते कमी होत असल्याची खात्री करा.

• बी.एम.आय. योग्य पातळीत

• येईपर्यंत गर्भधारणा पुढे ढकला.

• वैद्यकिय तपासणी व सल्ला

बीएमआय १८.५ ते २५ या पातळीमध्ये असेल तर तो तसाच राहू देण्यावर लक्ष ठेवा. योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि नियमित वजनावर लक्ष ठेवण्याचे महत्व समजून घ्या.

बी.एम.आय ३० किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या स्त्रीने जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

No comments:

Post a Comment