JSSK

 जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम कशासाठी? -

• माता व बाल मृत्युच्या अनेक कारणांपैकी प्रसूतीसाठी दवाखान्यात वेळेवर न पोहोचणे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

• ग्रामीण व दुर्ग भागात रस्ते चांगले नसल्याने, वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्याने माता आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयामध्ये वेळेवर पोहोचू शकत नाहीत.

• परिणामी वाटेत प्रसूती होणे, गुंतागुंत निर्माण होणे व प्रसंगी आई व बाळाच्या जिवाला धोका निर्माण होणे असे प्रसंग येऊ शकतात.

• दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दवाखान्यात प्रसूतीसाठी जाण्यासाठी वाहनभाडे, दवाखान्यातील तपासण्या, औषधोपचार, खाण्या-पिण्याची व्यवस्था यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन बरीचशी गरीब कुटुंबे दवाखान्यात प्रसूतीसाठी जाणे टाळतात.

• या दोन्ही बाबी लक्षात घेऊन भारत सरकारने ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे.

सर्व काही मोफत! -

• प्रसूतीसाठी दवाखान्यात येऊ इच्छिणाऱ्या गरोदर स्त्रीसाठी तपासण्या, औषधोपचार, आहार, संदर्भ सेवा इत्यादी मोफत देण्याची तरतूद आहे. याशिवाय १ वर्षापर्यंतच्या अर्भकासदेखील वाहन व्यवस्था, तपासण्या, औषधोपचार, संदर्भ सेवा मोफत मिळणार आहे.

• समाजातील कोणत्याही स्तरातील गरोदर स्त्रिया व बालकास याचा लाभ घेता येईल.

गरोदर स्त्रीसाठी सेवा

गरोदरपणात, बाळंतपणात व बाळंतपणानंतर ४२ दिवसांपर्यंत खालील सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.

• संपूर्णपणे मोफत बाळंतपण व गरज पडल्यास सिझेरियन शस्त्रक्रिया.

• मोफत औषधोपचार.

• रक्त, लघवी तपासणे अथवा सोनोग्राफी यांसारख्या तपासण्या मोफत (अर्थात आरोग्यसंस्थेच्या दर्जानुसार जेथे या सुविधा उपलब्ध असतील तेथे)

• मोफत रक्तपुरवठा.

• घरापासून दवाखान्यापर्यंत, एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात जाण्याची गरज भासल्यास आणि दवाखान्यातून घरी परत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था.

• दवाखान्यात इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

सेवांचा लाभ घेण्यासाठी...

• राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मदत केंद्रे (कॉल सेंटर्स) सुरू केली आहेत. इथे २४ तास सेवा उपलब्ध असते. १०८/१०२ ही टोल फ्री दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. आपण या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला त्वरीत वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. उपलब्ध असल्यास शासकीय वाहन अथवा नोंदणीकृत खाजगी वाहन उपलब्ध करून दिले जाईल.

• या संबंधी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्रे असून आपली काही तक्रार असल्यास या ठिकाणी अथवा १०४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

• माहितीसाठी नजिकच्या आरोग्य केंद्राशी, आपल्या गावची आशा किंवा एएनएमशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment