गर्भधारणा पूर्व आरोग्यसेवा

अ) गर्भधारणापूर्व आरोग्यसेवा

अर्भक मृत्यू होऊ न देण्यासाठी सर्व उपाय करणे गरजेचे आहेत. नवजात अर्भक मृत्यू टाळण्यासाठी भारत सरकारने भारतीय नवजात अर्भक कृती योजना म्हणजेच (India Newborn Action Plan) अंतर्गत काही सेवा गरोदर मातांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. या सेवांचा लाभ घेऊन नवजात मृत्यू टाळता येऊ शकतो.

१) गर्भधारणेपूर्वी आणि प्रसूतीपूर्व आरोग्यसेवा

२) प्रसूतीमधील सेवा

३) जन्मानंतर अर्भकाची लगेच घ्यावयाची काळजी.

४) निरोगी अर्भकाची घ्यावयाची काळजी.

५) कमी वजनाच्या आणि आजारी अर्भकांसाठी आरोग्य सेवा

६) नवजात अर्भकाच्या जीवित रहाण्यानंतरची आरोग्य सेवा.

स्त्रियांना गर्भधारणापूर्व आरोग्यसेवा मिळणे ही काळाची गरज आहे कारण -

• आपल्याकडे बहुतेक स्त्रियांची गर्भधारणा नियोजन न करताच झालेली आढळते.

• लहान वयातच मुलीचे लग्न केले जाते.

• लग्नानंतर लगेचच गर्भधारणा होते.

• यामध्ये मुलीच्या आरोग्यावर आणि तिच्या होणाऱ्या बाळावर अनिष्ट परिणाम होतात.

गर्भधारणेपूर्व बाळंतपणात नियोजनाचे महत्व -

• गर्भारपणात आढळणारे धोके नियोजन केल्याने टाळता येतात.

• गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी काही विशेष काळजी घेतल्याने बाळंतपण सुरळीत होते.

• गर्भधारणेपूर्व तब्बेतीची काळजी घ्यायला सुरुवात करावी.

• गर्भारपणाच्या तिसऱ्या महिन्यात बाळाच्या काही अवयवांची वाढ झालेली असते. त्यामुळे गर्भामध्ये होणाऱ्या काही विकृती टाळण्यासाठी उशीर झालेला असू शकतो.

• शिवाय मातेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या काही सेवा द्यायच्या राहून जातात.

• िवस राहण्यापूर्वीच वैद्यकिय सल्ला घेऊन काही आवश्यक आरोग्य सेवा घेणे हिताचे ठरते.

गर्भधारणापूर्व आरोग्यसेवांचा लाभ घेतल्यामुळे :

• गरोदरपणातील काही गुंतागुंती कमी करण्यास मदत होते.

• होणाऱ्या बाळामध्ये व्यंग असल्याचे प्रमाण कमी करता येते.

• अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, कमी वजनाचे अशक्त बाळ जन्मणे याचे प्रमाण कमी होते.

• बाळाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी करता येते.

एकंदरीतच मातांचे आणि होणाऱ्या बाळांचे आरोग्य सुधारण्यास आणि बाळांचे अपमृत्यू टाळण्यास मदत व्हावी यासाठी -

१) स्त्रियांनी गर्भधारणेपूर्वी बी.एम.आय. नॉर्मल ठेवून सर्वसाधारण पोषण स्थितीत यावे.

२) रक्तक्षय टाळण्याचे उपाय योजणे, त्याचे लवकर निदान व उपचार घेऊन आणि जंतनाशक औषध घेऊन हिमोग्लोबीन सर्वसाधारण पातळीवर आणवे.

३) नियोजीत गर्भधारणेपूर्वी तीन महिने फोलिक ॲसिड या जीवनसत्वाचे सेवन सुरु करावे जेणेकरून बालकांधील मेंदूच्या व मज्जासंस्थेच्या विकृतींचे प्रमाण कमी होईल.

४) तंबाखू व दारु यांचे गर्भावरील दुष्परिणाम जाणून घेऊन त्यांचे सेवन पूर्णत: थांबवणे.

५) किशोरवयात गर्भधारणा टाळून त्यातील माता आणि अर्भकास असलेले धोके टाळणे.

६) जननसंस्थेच्या जंतुसंसर्गाची लक्षणे जाणून त्यावरील उपाय योजून त्यांचे गर्भधारणेवरील दुष्परिणाम टाळणे. एकंदर जननसंस्थेच्या आरोग्याविषयी जागरुक रहाणे.

७) गर्भधारणेपूर्वी एकदा वैद्यकिय तपासणी करुन काही आजार असल्यास किंवा काही औषधे चालू असल्यास गर्भधारणेपूर्वी त्यासाठी आवश्यक उपायोजना करणे.

तुम्ही नवविवाहित असाल किंवा गर्भधारणेसाठी इच्छुक असाल तर गर्भधारणेचे नियोजन करण्याचे महत्व जाणून घ्या आणि तुमच्या कुटुंबियांना ही पटवून द्या.

No comments:

Post a Comment